शेतकरी काय अतिरेकी आहेत का ? मोदी सरकारवर राऊत कडाडले

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.शेतकरी शांततेने आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करायला ते काय अतिरेकी आहेत का? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. शेतकऱ्यांपेक्षा चीनवर बळाचा वापर केला असता तर चिनी सैन्य लडाखमध्ये घुसले नसते, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. शेतकऱ्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून लाठीमार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्ये आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करायला ते काय अतिरेकी आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

पंजाबच्या शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करत जगासमोर आदर्श ठेवला आहे. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला लगावला. तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही, अशा घोषणा दिल्या होत्या, अशी आठवण करून देत पंतप्रधानांनी तिथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.

Previous articleसत्तेसाठी शिवसेनेची मूळ विचाराला तिलांजली : प्रविण दरेकर
Next articleसरकारची वर्षपूर्ती झाली,पण जनतेची इच्छापूर्ती नाही : नारायण राणेंचा प्रहार