उध्दव ठाकरे यांची भाजपवर टिका
मुंबई दि. १३ भाजप आम्हाला मित्र पक्ष मानत असेल तर त्यांनी आमच्या आनंदात सहभागी व्हावे, घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये, अशी टिका नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे खा. किरीट सोमय्यांवर केली.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेच्या दिलीप लांडे, परमेश्वर कदम,दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव,अश्विनी माटेकर,ह्रषल मोरे या सहा नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टिका केली.इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी असा टोला लगावत त्यांनाही कळले असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो, असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने ते अधिकृतरीत्या शिवसेनेचे झाले आहेत. असे सांगत उध्दव ठाकरे यांनी या सहा नगरसेवकांचे अभिनंदन केले. भांडूप मधिल पराभवामुळे शिवसेनेने हे पाऊल उचलले का अस सवाल केला असता,एका दिवसात शिवसेना इतकी जमवाजमव करत असेल, तर आमच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल असेही ते म्हणाले. फोडाफोडी हि आता झाली नाही, यापूर्वीही झाली होती, जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत. स्वतः नगरसेवक परत येत असतील तर मी दार का बंद करून घेऊ, असा सवालही त्यांनी यावेळी केला. आम्ही दुस-या पक्षातून नगरसेवक घेतले तर मित्र पक्षाच्या पोटात दुखायचे कारण काय असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाने खरे तर आमच्या आनंदात सहभागी झाले पाहिजे असे स्पष्ट करतााच घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये असा टोला ठाकरे यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांना लगावला.
शिवसेनेचे संख्याबळ वाढल्याने त्यांच्या पोटात मुरडा येत असेल, तर ते मित्रपक्ष कसले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप आम्हाला मित्रपक्ष मानत असेल, तर आमचे बळ वाढल्याने त्यांना पोटदुखी कशाला असेही ते म्हणाले.भांडुपची पोटनिवडणूक भाजपने नाही, तर सहानुभूतीने जिंकली, असा आरोपही ठाकरे यांनी केला. मूळात हा विजय भाजपचा नाही. काँग्रेसच्या एका महिला नगरसेविकेचा मृत्यू झाल्यानंतर भाजपने त्यांच्या मुलीला फोडून त्यांच्याकडून उमेदवारी दिली. साहजिकच ज्या व्यक्तीचे निधन झाले त्याला सहानुभूती मिळते. त्यामुळे कालचा विजय हा भाजपचा नसून सहानूभूतीचा आहे, असे सांगत भाजपच्या नेत्यांची खिल्ली उडविली. नांदेडमधील भाजप पराभवाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेने दिलेला कौल सर्वांनी मान्य करायला पाहिजे आणि तो. मी मान्य करतो असे सांगत या विजयाबद्दल त्यांनी अशोक चव्हाण व काँग्रेसचे अभिनंदन केले. नांदेडचा पराभव हा भाजपच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असू शकतो असेही त्यांनी म्हटले.
मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी शिवसेनेच्या प्रवेशाबाबत आपली भूमिका मांडताना सांगितले की, भाजपच्या एका नेत्याने मुंबईत भाजपचा महापौर बसवणार अशी जाहीर भूमिका मांडली. या घटनेमुळे आम्हाला चीड आली. भाजपचा महापौराची भाषा म्हणजे मुंबईतील मराठी माणसाला संपविण्याचा डाव आहे. त्यामुळे आम्ही ठरवले की, मुंबईत शिवसेनेचाच आणि मराठी व्यक्ती महापौर राहिला पाहिजे या भूमिकेतून आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे लांडे यांनी सांगितले.