पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून युवकांनी उद्योजक व्हावे
– पशुसंवर्धन मंत्री जानकर
पुणे : दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे. अंड्यांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती,व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्याने पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंड्याचे पोषणमूल्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, कुक्कुट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, बाजार समितीचे चेअरमन दिलीप खैरे, सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे आदी उपस्थित होते.