शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा पाठिंबा

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद दिले जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. शरद पवार यांनी स्वतः यावर पडदा टाकला असला तरी, ही चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांच्या युपीए अध्यक्ष पदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काल ट्विट करत काँग्रेस संपवण्याचा हा कट असल्याचे म्हणत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, आजचा सोहळा म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शनाचा हा सोहळा आहे. त्यांनी ५० वर्षांत अनेक चढउतार बघितले आहे. त्यांनी अनेकांसोबत काम केले असून त्यांचा अनुभव मोठा आहे. शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल, असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, शरद पवारांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. पक्षातील कार्यकर्ता आणि नेता कुणालाही ते सहज उपलब्ध होतात. ते आजही देशाचे नेतृत्व करत असून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत, असा व्यक्ती युपीएचा अध्यक्ष झाला तर मला नक्कीच आवडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यानंतरच युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली. असे असतानाच संजय निरुपम यांनी शुक्रवारी एक ट्वीट केले. त्यात ते म्हणाले की, “दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात जे अभियान चालू आहे, शरद पवार यांना युपीएचा अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच अभियानांतर्गत २३ सह्यांचे पत्र लिहले गेले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याची उणीव शोधण्यात आली. काँग्रेस संपवण्याचा एक मोठा प्लान चालू आहे”. निरुपम त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ माजली होती.

Previous articleशरद पवार@८०; पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
Next articleचंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा