मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात आजवर बऱ्याच गोष्टी घडल्या असून त्याचे दाखले आजही दिले जातात. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी अशीच एक घटना कायमच सर्वांच्या स्मरणात राहील. भल्या पहाटेचा शपथविधी राज्यातील प्रत्येक जनतेच्या स्मरणात आहे. हाच विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेला शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याच संमतीने झाल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला. या मुद्द्यावरून आता पुन्हा राजकारण रंगताना दिसत असून भाजप नेते निलेश राणेंनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र डागले आहे.
देवेंद्र फंडणवीस यांनी नुकतीच एक ‘ऑफ रेकॉर्ड’ मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी ८० तासांचे स्थापन झालेले सरकार, त्यासाठी कोण कोण सूत्रधार होते, आखण्यात आलेली रणनीती यासंदर्भात भाष्य केले. महत्त्वाचे म्हणजे या सरकार स्थापनेला शरद पवारांची देखील संमती असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. यासंदर्भातील वृत्त अनेक माध्यमांत आता झळकत असून त्यावर टीका टिप्पणी केली जात आहे. निलेश राणे यांनीही ट्वीट करत थेट शरद पवारांना लक्ष्य केले आहे. “गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळते पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते आणि आम्हाला सगळे कळते असे समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”, अशी टीका राणेंनी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या खुलाशामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.
नेमके झाले काय ?
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार,नागपूरमध्ये तरुण उद्योजक आणि व्यवसायिकांच्या जनरेशन नेक्स्ट ‘एन्टरप्रेरनर फोरम, यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित केली होती. ही मुलाखत ऑफ रेकॉर्ड घेण्याचे ठरले होते. म्हणजेच त्याचे कुठेही प्रसारण होणार नव्हते. तसेच कार्यक्रमात सुद्धा निवड लोकांचीच उपस्थिती होती. या मुलाखतीत फडणवीस यांना दीड वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनीही संपूर्ण घटनाक्रम सांगितला. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी वाद निर्माण झाला होता. शिवसेनेने आमच्या सोबत येण्यास नकार दिला होता. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणार असल्याचे समजले. त्यामुळे आमच्याकडून वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरू होती. राष्ट्रवादीशी देखील आमचे बोलणे झाले होते. राष्ट्रवादीकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्तावही आला होता, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर खातेवाटप, जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार याबाबत देखील शरद पवारांशी चर्चा झाली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केला. ही सर्व चर्चा ऑफ रेकॉर्ड होती मात्र, ही मुलखात चुकून फेसबुकवर प्रसारित झाल्याचे नंतर लक्षात आले. त्यामुळे फेसबुकवरून ताबडतोब मुलाखतीची लिंक हटवण्यात आली. मात्र तोवर फडणवीसांचा हा ऑफ रेकॉर्ड संदेश अनेकांपर्यंत पोहोचला. महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमात सर्वांचे फोन बंद ठेवण्यात आले असताना फडणवीस यांच्या टीमकडूनच चुकून फेसबुक लाईव्ह सुरू झाले. त्यामुळे हे फेसबुक लाईव्ह चुकून होते की जाणूनबुजून यावर आता चर्चा रंगली आहे.