मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्कारासारखे गंभीर आरोप केले होते. यासह धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती.या सर्व प्रकारावर भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र असे असताना रेणू शर्मा हिने तक्रार मागे घेतली त्यामुळे मुंडेंना मोठा दिलासा मिळाला.पंरतु या सर्व घडामोडी दरम्यान बहीण पंकजा मुंडे यांनी मात्र मौन बाळगले होते.अखेर आज पंकजा मुंडे यांनी या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.सोबतच या विषयाचे राजकारण करणाऱ्यांनाही त्यांना टोला लगावला.
पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकीकडे धनंजय मुंडे मोठ्या संकटात अडकलेले असताना पंकजा यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र पंकजा यांनी याविषयी मौन बाळगणेच पसंत केले होते. आज अखेर त्या बोलत्या झाल्या. “तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचे समर्थन मी कधीही करू शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होतो”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे.एक नाते आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचे राजकीय भांडवल केले नसते आणि आताही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच,” असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणावर सर्व सखोल चौकशी झाल्यानंतर धनंजय मुंडे हे दोषी आढळल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. मात्र तरीही राज्यातील भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर आता स्वतः रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.