लोकांचा अंत पाहू नका; मराठा आरक्षणावरून दोन्ही राजेंची सरकारवर तोफ

मुंबई नगरी टीम

सातारा : मराठा आरक्षणाचा पेच लवकरात लवकर सुटावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र केवळ ठाकरे सरकारमुळेच आरक्षणाची अशी स्थिती झाल्याची टीका विरोधक करत आहेत. यावेळी तर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी आरक्षणावरून एकाच सुरात ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. साताऱ्यातील अण्णासाहबे पाटील फाउंडेशच्या उद्घाटन सोहळ्यावेळी या दोन्ही नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकांचा अंत पाहू नका – उदयनराजे भोसले

भेदभाव करणे हे लोकप्रतिनिधींच्या पदाला शोभत नाही. समाजाच्या मागण्या काय आहेत याचा विचार केला पाहिजे. दुसऱ्यांचे हिरावून आम्हाला आरक्षण देऊ नका. पण जसा त्यांना न्याय दिला मग, आमच्यावर अन्याय का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वाईट आहे. जास्त गुण मिळूनही प्रवेश मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे. त्यामुळे जे लोकप्रतिनिधी तुम्हाला साथ देणार नसतील, तर तुम्हीपण तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहायला हवे, असे आवाहन उदयनराजेंनी केले. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालायला हवे, याचा पुनरूच्चार करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा साद घातली आहे.

एवढा मोठा पेच असताना सर्वोच्च न्यायालयात सरकारी वकील हजर राहत नाही. त्यामुळे हे सगळे जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येते. लोकांचा अंत पाहू नका. एकदा जर उद्रेक झाला तर तो थांबवणार कोण? असा सवाल उदयनराजेंनी केला. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबतचे राजकारण थांबवले पाहिजे, लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे. लोकांनी मोर्चे काढले तरी यांना कळत नाही, अशा शब्दांत उदयनराजेंनी यावर नाराजी व्यक्ती केली.

सरकारकडून मराठा आरक्षणाला खोड घालण्याचे काम

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडताना राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी तत्कालीन फडणवीस सरकारचे कौतूक करत ठाकरे सरकारवर टीका केली. फडणवीसांनी नुसते आरक्षण दिले नाही तर ते न्यायालयातही टिकवले होते. नंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले. पण, या सरकारला ते टिकवता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचे काम करत आहे. आरक्षणावरून टोलवाटोलवी सुरू असून त्याला आपणच जबाबदार आहोत, असे ते म्हणाले. आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा सगळ्या राजकीय चौकटी बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने आरक्षण आणि लढा आपण जिंकू शकतो असा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे शिवेंद्रराजे म्हणाले.

Previous articleतुम्हाला महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर… चंद्रकांत पाटलांची गृहमंत्र्यांवर टीका
Next articleप्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्याला नाराज करुन चालणार नाही