मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्रात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपवली आहे.त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले असून त्यावर पुन्हा निवडणूक होणार आहे.पटोले यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा असतानाच या सर्व घडामोडीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.आजच्या ‘सामना’ अग्रलेखात देखील नाना पटोले यांच्याविषयी भाष्य करण्यात आले असून त्यावर अनेक चर्चा रंगलेल्या होत्या.त्यावरही संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
संजय राऊत हे आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘नाना पटोलेंवर सामनातून टीका झालेली नाही. सामना काळजीपूर्वक वाचा.नानांच्या क्षमतेचे त्यात कौतुक करण्यात आले आहे. काँग्रेसला संजीवनी देण्याचा त्यांचा उत्साह महत्त्वाचा आहे.आज सत्तेमध्ये नसला तरी काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहे.पक्षाची परंपरा, इतिहास महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी. मजबूतीने काँग्रेस उभी राहावी, अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांनी पक्षातंर्गत परिवर्तन केले असेल, तर तो त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. नाना आम्हाला प्रिय आहेत”, असे संजय राऊत म्हणाले. तसेच नाना पटोले हे सक्षम आणि आक्रमक नेते आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम नानांनी करावे. संपूर्ण देशात काँग्रेसला ऊर्जा मिळावी. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हीही आमचा पक्ष वाढवू, असेही ते म्हणाले.
नाना पटोलेंच्या राजीनाम्याने नाराजीनाट्य ?
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,”नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असे आम्ही सामनात म्हटले आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असते.त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्याने पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचे सरकार आहे. तीन पक्षांचे बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच तिन्ही पक्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद आता खुले झाले आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांनी ही गोष्ट म्हटली आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा होईल, असेही संजय राऊत म्हणाले.