मुंबई नगरी टीम
- संजय राठोड यांनी राजीनामा दिला की घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न
- धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
- चव्हाण प्रकरणाचा तपास हा कोणत्याही दबावाखाली होऊ नये
मुंबई । पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला ही बाब सकारात्मक असून,या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी,असे सांगताच रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कालच संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उध्द ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे.याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते.त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या आरोपाला उत्तर देताना केलेल्या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली होती.रेणू शर्मा यांनी अशाच प्रकारे अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याचा आरोप झाल्याने रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्यामुळे मुंडे यांचे मंत्रीपद वाचले होते.या प्रकरणी मुंडे यांना दिलासा मिळाला असतानाच त्यांच्या दुस-या पत्नी करूणा शर्मा यांनी आपल्या मुलांना धनंजय मुंडे यांनी शासकीय निवासस्थानी डांबून ठेवल्याची तक्रार केली होती.संजय राठोड हे पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आले असतानाच मुंडे राठोड प्रकरण अधिवेशनात गाजण्याची चिन्हे होती.मात्र राठोड यांनी राजीनामा दिल्याने राठोड प्रकरण शांत होताच आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या मागणीमुळे पुन्हा एकदा विरोधक मुंडे प्रकरण लावून धरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पक्षाने घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देण्याची एक पायरी ओलांडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी. त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असेल तर वेगळी यंत्रणा निर्माण करण्यात यावी.सध्या राजकीय नेत्यांची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने यासाठी एक वेगळी यंत्रणा अशा प्रकरणाच्या तपासणीसाठी असावी का असेही वाटू लागले आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास हा कोणत्याही दबावाखाली होऊ नये.सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. पूजा प्रकणातील क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे हे शोधणे यंत्रणेचे काम आहे. या प्रकरणावरून कोणतेही राजकारण होता कामा नये,राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती. आता उशिरा राजीनामा दिल्याने प्रतिमा उजळेल असे नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातलाच गेला पाहिजे, असेही मुंडे म्हणाल्या.