मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने येत्या ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.मात्र काही लोकांकडून हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे,याबद्दलचा निर्णय घेण्यात आला असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने येत्या ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू केले आहे.मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.आजच राज्य सरकारने आज ब्रेक द चेन अंतर्गत नव्याने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित जारी करीत,सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने,पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातच किराणा किंवा भाजीपाला,फळे खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याचे चित्र असल्याने आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल,अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.राज्यातील कोरोनाची संख्या अटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले तरी सुद्धा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच रूग्णांना बेड मिळत नाहीत.यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल.यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील असेही अस्लम शेख यांनी सांगितले.निर्बंध घालूनही रस्त्यावरून वाहने फिरत असल्याचे चित्र राज्यात आहे.आम्ही सर्वांनीच मुख्यमंत्र्यांना तात्काळ कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे सांगितले आहे. लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही. पण आज लोकांना बेड,ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनच्या उत्पादनापेक्षा आपल्याला जास्त ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून कठोर लॉकडाऊन करावा लागेल अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. कडक निर्बंधाऐवजी संपूर्ण लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.