प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबई दि. 17 राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात सोमवारी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीची सरशी झाली असून या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, मंगळवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यातही भाजपाने स्पष्ट आघाडी घेतली असून पक्षाच्या सरपंचांची संख्या एक हजारापेक्षा जास्त झाली आहे. संपूर्ण चित्र स्पष्ट होईल त्यावेळी भाजपाचे सरपंच अधिक संख्येने निवडून आलेले दिसतील. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३४९७ पैकी १७९२ सरपंचपदे जिंकून भाजपाने निर्विवाद प्रथम क्रमांक मिळवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विकासकामांबद्दल या निकालाने पसंती व्यक्त केली आहे.
त्यांनी सांगितले की, उपलब्ध माहितीनुसार या टप्प्यातील विशेष बाब म्हणजे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात भाजपाने अभूतपूर्व यश मिळविले आहे. या तीनही जिल्ह्यात भाजपा प्रथम क्रमांकावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यासोबत सातारा व पुणे जिल्ह्यात भाजपाने अनेक ग्रामपंचायती जिंकून पक्षाचा पाया ग्रामीण भागात बळकट केला आहे. दुसऱ्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यात ११२ पैकी ५६, नागपूर २३६ पैकी १२६, भंडारा ३६२ पैकी १७५, चंद्रपूर ५२ पैकी २८ आणि गडचिरोली २६ पैकी १५ ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या. पूर्व विदर्भात पक्षाला मिळालेले हे यश अपेक्षितच होते. ठाणे जिल्ह्यात ४१ पैकी २२ ग्रामपंचायती जिंकून भाजपाने चमकदार कामगिरी केली आहे. कोकणात शंभराहून अधिक ग्रामपंचायती जिंकण्यात कार्यकर्त्यांनी यश मिळवले आहे. अमरावती जिल्ह्यात २५५ पैकी १५० ग्रामपंचायती भाजपाने ताब्यात घेतल्यामुळे विदर्भातील पक्षाची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.