मुंबई नगरी टीम
मुंबई । वाढत्या कोरोना रूग्णांना आळा घालण्यासाठी राज्यात लागू केलेले निर्बंध येत्या १ जून रोजी संपुष्टात येत असून या दिवसापासून राज्यातील सर्वच व्यापार पूर्ण वेळ सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.यापुढे राज्यातील दुकाने बंद राहिल्यास राज्यातील व्यापार शेजारील राज्यात जाईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू असल्याने राज्यातील दुकाने यापुढे बंद राहिल्यास महाराष्ट्रातील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भिती आहे व हे नुकसान कधीही भरून निघणार नाही त्यामुळे आता १ जुन नंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापा-यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने आता दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली असून दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका,नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करणे,वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना फी मध्ये एक वर्षाची माफी द्यावी, प्रॉपर्टी टॅक्स,वीज बिल व कर्जावरील व्याज माफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापा-यांसाठी जाहीर करावे अशी मागणी गांधी यांनी केली आहे.
राज्यातील कोरोना संक्रमणाचे प्रमाण नियंत्रणात आले असून १ जुन नंतर रेडझोनमधील जिल्ह्यांसह सर्वच जिल्ह्यातील व्यापार सुरू झाला पाहीजे अशी विशेष मागणी करून व्यापारी व त्यांच्या कर्मचार्यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.राज्यातील बहुतांश दुकानदारांनी लसीकरण करून घेतले असून उर्वरीत व्यापा-यांनीही लवकरात लवकर स्वतःचे व कर्मचा-यांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व महाराष्ट्र चेंबर तर्फे करण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पाठवण्यात आल्या असून सरकाने त्वरीत निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे.