मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे टीकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्रित राहून सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल,असेही पवार यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तिन्ही पक्षाच्या लोकांनी या पर्यायाच्या बांधीलकीतून योग्य रीतीने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि परिणामस्वरूप हे आघाडी सरकार उत्तम रीतीने काम करतंय… कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे काम करेल.
#NCP22 #NCPFoundationDay pic.twitter.com/nNqI4sXAhI
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 10, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीचे कौतुक करीत,शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे असल्याचे सांगितले.त्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक करतानाच,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र काम करु शकतात हे कोणाला पटले नसते,आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले असून,राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्यानंतर हे सरकार किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती,अशी आठवण करुन देताना हे सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.यावेळी पवार यांनी शिवसेनेचे कौतुकही केले.परवा मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची स्वतंत्र भेट घेतली आणि अनेक चर्चांना सुरूवात झाली असे सांगत त्यांनी टीकाकारांना सुनावले.राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत कधी काम केले नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षापासून बघत आहे.असे सांगतानाच, शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जेव्हा जनता पक्षाची सत्ता आली त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना.शिवसेना फक्त पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कसलीही चिंता न करता इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे पवार यांनी सांगून,राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टीकेल आणि पाच वर्षे काम करेल,केवळ कामच करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्रित करून देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.देशात अनेकांनी राजकीय पक्ष काढले.देशात जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षात संपला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ वर्षे पूर्ण केली आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाला.सहकाऱ्यांच्या कष्टाने,जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत असेही पवार म्हणाले.आपण कधी सत्तेत होतो तर कधी नव्हतो, पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नाही,असे पवार यांनी सांगितले.