मुंबई नगरी टीम
परळी । कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना काही आजार उद्भवले तरच आपण दवाखान्यात घेऊन जातो,परंतु त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे व एखाद्या आजाराचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे,याचाच विचार करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वयोवृद्ध व्यक्तींची वर्षातून किमान एकदा मोफत आरोग्य तपासणी करता यावी यासाठी ‘शरद शतम’ ही योजना शासन स्तरावर प्रस्तावित केली असून लवकरच या योजनेला मूर्त स्वरूप देणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ हा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून मंत्री व जनता असा थेट संवाद घडवण्याचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत धनंजय मुंडे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला.या संवादादरम्यान मुंडे यांनी शरद शतम या प्रस्तावित योजनेची माहिती दिली व लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले.
प्रत्येक महिन्याला आपल्या विभागामार्फत केलेल्या कामकाजाचा जनतेसमोर अहवाल सादर करणारे एकमेव मंत्री म्हणून धनंजय मुंडे ओळखले जातात. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामकाजाचा व विविध निर्णयाचा लेखाजोखा त्यांनी पुन्हा एकदा जनतेसमोर मांडला आहे.यावेळी बोलताना त्यांनी स्वाधार योजना तालुकास्तरावर विस्तार, प्रदेश शिष्यवृत्ती योजनेतील केलेले सकारात्मक बदल व त्याचे फायदे, विभागाच्या अन्य शिष्यवृत्ती व विशेष सहाय्य योजना यांबाबत सविस्तर माहिती दिली.विभागांतर्गत रिक्त असलेली वर्ग -३ व वर्ग -४ ची रिक्त पदे भरण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सनियंत्रण व चालू कामाचा आढावा आपण स्वतः दर आठवड्याला करत असून सदर काम निर्धारित वेळेतच पूर्ण केले जाईल असा विश्वास यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला.जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेला सुकर करण्यासाठी केलेले व करत असलेले बदल सांगत असताना ही संपूर्ण प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर राबविण्याचा मानस मुंडेंनी व्यक्त केला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामाला गती देत असून, यांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेत घोषित करण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील २० वसतिगृहे याच शैक्षणिक वर्षात सुरू करणार असल्याचे मुंडेंनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.राज्यात सत्तांतर झाल्यापासून मागील दीड वर्षाच्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांची माहिती व चर्चा करत असताना रखडलेली विद्युत सहाय्यक भरती पूर्ण करण्यासाठी आपण ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे आग्रही मागणी केली असून ही प्रक्रिया लवकरच पुन्हा सुरू होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचीही माहिती दिली.
मी मराठा आरक्षणाच्या चळवळीतील कार्यकर्ता…
मराठा आरक्षणाच्या बाबत भूमिका विचारली असता, मी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतील एक कार्यकर्ता आहे. मी जिल्हा परिषदेत असताना आरक्षणासाठी राज्यात पहिला ठराव दिला होता, राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. तर स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे पाप भाजपचेच आहे, याबाबतचा इंपेरिकल डेटा उपलब्ध करण्याबाबत भाजप सरकारच्या काळात जे काही घडलं ते सबंध ओबीसी समाजाला ज्ञात आहे. त्यातून आता भाजपने ओबीसी समाजाची कितीही दिशाभूल केली तरी लोक आता सुज्ञ झालेत, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.