मायावतींनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.२६ खऱ्या आंबेडकरवादी असाल तर बौद्ध धम्माची दीक्षा घ्या, धम्मदीक्षेची केवळ पोकळ घोषणा करू नका असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी बसपच्या नेत्या मायावती यांना लगावला आहे. भाजपने आपली भूमिका बदलावी अन्यथा हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेवू असा इशारा मायावती यांनी नुकताच दिला होता . त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .
बसपचे संस्थापक दिवंगत कांशीराम यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बसपच्या प्रमुख मायावती यांनी अनेकदा बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कधीच धम्म दीक्षा घेतली नाही . त्यामुळे त्या खरेच आंबेडकरवादी आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या खऱ्या आंबेडकरवादी असतील तर त्यांनी कोणत्याही मुहूर्ताची वाट न पाहता त्वरित बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी केले आहे.
मायावती यांनी दलित अत्याचाराच्या मुद्द्यावरून राजकारणासाठी भाजपवर आरोप करू नयेत. मात्र दलित अत्याचार हे जातीवादातून होत असतात . सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी दलितांवर अत्याचार होतात . त्यामुळे दलित अत्याचाराच्या विषयावर राजकारण करण्यापेक्षा सामाजिक दृष्टिकोनातून प्रश्न सोडविला पाहिजे. मायावती मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . समाजवादी पक्षाचे ;काँग्रेसचे बसपचे अथवा भाजप चे कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जातीवादातून दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.ते रोखायचे असतील तर जातीवाद संपविला पाहिजे. दलित अत्याचारावरून केवळ राजकारण करू नये असे आवाहन आठवले यांनी केले आहे. मायावती यांनी वारंवार धर्मांतराची घोषणा करणे थांबवून त्वरित बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी असे आवाहन आठवले यांनी केले आहे.