मुंबई नगरी टीम
मुंबई । १९६७ साली काँग्रेसचे तरूण नेतृत्व शरद पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेले शरद पवार यांच्या पुढे मोठी संकटं उभी राहिली होती.पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच बारामती तालुक्यातल्या साऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि शरद पवार यांना पाडण्यासाठी एकजूट केली. पवार यांच्या विरोधात सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाबालाल काकडे यांना सर्वपक्षीय उमेदवार म्हणून उभं केलं होतं.
१९६६ मधला तो ऑक्टोबरचा महिना होता राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना “बारामतीतून संधी मिळाली, तर लढशील का ? अशी विचारणा केली. त्या सुमारास पवार यांचा बारामतीशी चांगलाच संपर्क वाढलेला होता, शिवाय विविध संस्थांबरोबर अनेक विकास कार्यक्रमांत पुढाकार असल्याने निवडणूक लढवण्यासाठी पवार यांनी मनाची तयारी केली होती.पवार यांचा बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातील लोकांशी संपर्क होता. शरद पवार हे पुण्यात शिक्षणासाठी असताना त्यांनी बारामती भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणलं होतं. सात-आठशे विद्यार्थी त्यांच्या संघटनेत होते.ते सारे शरद पवार यांच्या पाठीशी निरपेक्ष निर्विवादपणाने उभे राहिले होते.निवडणुकीला उभं राहण्यासाठी जय्यत तयारी असूनही उमेदवारी मिळणं काही सोपी गोष्ट नव्हती.त्या काळात उमेदवारी देतानास्थानिक संघटनेच्या मताला मोठी किंमत होती. तालुक्याची पक्ष संघटना उमेदवारांच्या नावाची शिफारस जिल्ह्याकडे पाठवायची. त्यातल्या साधारण ऐंशी टक्के नावांवर प्रदेशही शिक्कामोर्तब करत असे.त्यानंतर प्रदेश काँग्रेसकडून दिल्लीला शिफारस केल्यावर एक-दोन जागांचा अपवाद वगळता, बाकी सर्व नावं कायम ठेवली जायची.त्याकाळी उमेदवारीसाठी दिल्लीवारी ही भानगडच नव्हती.
त्यावेळी १९६७ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरला खरा,पण त्याला स्थानिक पातळीवर आक्षेप घेतला गेला आणि सारे नेते एकत्र आले.त्यांनी पवार यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला.या तरूणाला एकदाका संधी मिळाली,तर आपली सारी राजकीय दारं बंद होतील, अशी धास्ती त्यांना होती.आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, पण शरद पवार यांना उमेदवारी देवू नका’, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली.बारामती तालुक्यातून प्रदेशाकडे ‘एक विरुद्ध अकरा’ अशी शिफारस करण्यात आली.शरद पवार यांच्या नावाला खूप विरोध आहे आणि त्यांना उमेदवारी दिली, तर उमेदवार पडेल त्यामुळे त्यांना सोडून कुणालाही उमेदवारी द्या’,असा आदेश जिल्हा शाखेतून प्रदेशाकडे पाठवला गेला.शेवटी बारामतीमधून कोणाला उमेदवारी द्यायची याचा वाद प्रदेश संसदीय मंडळापुढे गेला.त्या वेळी प्रदेशाची बैठक यशवंतराव चव्हाण यांच्या’रिव्हिएरा’ या निवासस्थानी होत असे.इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना बारामतीच्या उमेदवारांच्या मुलाखतींच्या वेळी पवार त्या ठिकाणी थांबले नाही.मुलाखती झाल्यावर संसदीय मंडळ जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून त्यांची मते जाणून घेत असे.
शरद पवार यांच्या नावास स्थानिक नेत्यांचा प्रखर विरोध होता.मात्र विनायकराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांनी पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला.पण जिल्ह्यातील नेत्यांनी अजिबात ऐकले नाही.त्यांनी पवार यांच्या उमेदवारीला आडकाठी सुरूच ठेवली.या चर्चेच्या धुमश्चक्रीत यशवंतराव चव्हाण अचानक एका नेत्याला प्रश्न केला,”महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे सत्तर जागांपैकी किती जागांवर काँग्रेस विजयी होईल?” या नेत्याने उत्तर दिले की, ‘एकशे नव्वद ते दोनशे जागांवर विजय नक्कीच मिळेल,त्यावर यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिप्रश्न केला, “याचा अर्थ आपले ऐंशी उमेदवार पराभूत होतील का ? संबंधित नेत्याने तशी शक्यता असल्याचे चव्हाण यांना सांगितले. यावर यशवंतराव चव्हाण म्हणाले, “ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली, असं समजा आणि शरद पवार यांनाच उमेदवारी द्या.त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे बारामतीतून शरद पवार यांची उमेदवारी पक्की झाली.पवार यांची उमेदवारी पक्की झाली खरी, परंतु खरी संकटं पुढे होती.
पवार यांच्या नावाची घोषणा होताच तालुक्यातल्या साऱ्या ‘काँग्रेस’च्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि पवार यांना निवडणूकीत पाडण्यासाठी एकजूट केली.त्यावेळी पवार यांच्या विरोधात ‘सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाबालाल काकडे यांना सर्वपक्षीय उमेदवार म्हणून उभं केलं. पण पवार यांच्या मागे तरुणवर्ग मोठ्या संख्येनं एकवटला होता.या निवडणुकीत ‘प्रस्थापितांच्या विरोधातला लढा’असा सूर पवार गटाने पकडला. बारामतीमधिल सर्व महाविद्यालयीन तरुण,पुण्यातील बारामतीच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे युवक प्रचारात हिरिरीने उतरले होते. बारामती तालुक्यात पाझर तलाव,नाला,रस्ते अशी खूप दुष्काळी कामं पवार यांनी केलेली होती. या कामांवरचे मजूरही पवार यांच्या बाजूनं प्रचारात उतरली. त्यावेळी राजकारणाच्या चाकोरीबाहेरचा डॉक्टर,व्यापारी, वकील, शिक्षक पवार यांच्या पाठीशी एकजिनसी उभा राहिला.पवार यांच्या शेतात पिकणाऱ्या शेतीमालाच्या विक्रीसाठी अनेक गावांतल्या बाजारांत ते जात असे.त्यामुळे त्या गावांमध्येही पवार यांच्या बाजूनं निवडणुकीत काम करायला माणसं तयार होती.पवार यांचे बंधू दिनकरराव पवार आणि अनंतराव पवार यांनी प्रचारमोहिमेत लक्ष घातलं होतं.यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्यसाठी बारामतीत येऊन सभा घेतली.त्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि ‘बारामतीला एका नव्या तरुणाचं नेतृत्व लाभतं आहे’ याचं स्पिरीट एवढं तयार झालं, की पवार हि निवडणूक सहज जिंकले. बाबालाल काकडे यांच्यापेक्षा त्यांना दुप्पट मताधिक्य मिळाले.पवार यांच्या संसदीय राजकारणातल्या अठेचाळीस वर्षांच्या अपराजित कारकिर्दीचं ते पहिलंच पाऊल होते.