राज्य शासनामार्फत ‘मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक‘ उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.२६ मंगेशकर कुटुंबियांनी कायमच सामाजिक आशय जपला आहे. पंडित दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून संवेदनशीलता टिकवून ठेवली आहे. व्यक्ती कलेने मोठा होतो, पण मला वाटते की मंगेशकर कुटुंबिय हे संगीतासह त्यांनी जपलेल्या सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेमुळे मोठे झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक रसिकांच्या मनात मंगेशकर कुटुंबियांचे स्थान आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तसेच पंडित हदयनाथ मंगेशकर यांचा ८० वा वाढदिवस आणि हृदयेश आर्टसचा २८ वा वर्धापन दिन यांचे औचित्य साधून ‘अमृत हृदय – स्वर लता’ हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.त्यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मंगेशकर कुटुंबिय आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.