मुंबई नगरी टीम
पुणे । राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्याने सरकारने आपल्याद्वितीय वर्षपूर्तीचा गाजावाजा केला नाही.त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते.यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला.महाविकास आघाडी सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम फडणवीस सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संकट आले.मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती पाहिली तशी परिस्थिती राज्य सरकारने राज्यात निर्माण होऊ दिली नाही.यासाठी कोविड सेंटर्स,टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजनसाठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्य सरकारने वेळोवेळी केल्याचे मलिक यांनी सांगितले.गुजरात राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या लपवण्यात आली. उत्तरप्रदेशमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात आले, याकडेही मलिक यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.महाविकास आघाडी सरकारने विकासाची कामे कोविडमध्ये थांबवली, मात्र कोणतेही प्रकल्प रद्द केले नाहीत. शिवाय विविध धोरणांवरही भर देण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कौशल्य विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याने राज्यसरकारने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून बेरोजगारांचा फायदा करुन देण्याचा विचार केला आहे. ही नवीन योजना राज्यात बेरोजगारी संपविण्यासाठी राबविण्यात येईल असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाकित विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत.मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्य सरकार पाडणार नाही तर हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार स्थापन करू अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार पडणार नाही हे ते आता त्यांनी स्वीकारत आहे असा टोलाही मलिक यांनी लगावला.राज्यात २०२४ मध्ये पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल असा विश्वसाही मलिक यांनी व्यक्त केला.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षासाठी नव्हे तर पुढील २५ वर्षांसाठी असेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे असेही मलिक म्हणाले.