गृहराज्यमंत्री डाॅ.रणजीत पाटील यांनी शिंदे कुटुंबियांचे केले सात्वन
मुंबई दि. २९ कर्तव्यावर असताना मृत्यू झालेले रेल्वे पोलीस दत्तात्रय शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन राज्याचे गृहराज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांनी केले असून, या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
रात्रपाळीसाठी कर्तव्यावर येत असताना रेल्वे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात रात्रपाळीसाठी हजर होत असताना कांजूरमार्ग स्थानकाजवळ ते जखमी अवस्थेत आढळले. रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी तात्काळ शिंदे कुटुंबियांशी दूरध्वनी वरून संपर्क साधला व त्यांचे सांत्वन केले. यावेळी गृहराज्यमंत्री पाटील यांनी शिंदे यांच्या पत्नी व मुलगा यांच्याशी देखील संवाद साधला. त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या सहकार्याने सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन डाॅ.पाटील यांनी दिले. तसेच या प्रकरणात जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामाच्या तणावामुळे शिंदे यांनी आत्महत्या केली? की हा अपघात आहे? या दिशेने कुर्ला रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.गृहराज्यमंत्री पाटील यांनी संबंधित अधिका-यांशी बोलून या प्रकरणाचा सखोल तपास करून नियमानुसार शिंदे यांच्या वारसांना मदत करण्याचे आदेश दिले.