२०१९ मध्ये उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार
मुंबई दि.३० भारतीय जनता पक्ष हा रावण आणि कपटी शत्रू आहे. ते पाठीमागून लढणार आहेत त्यांनी समोरून लढल्यास त्यांचा समाचार घेवू , येणा-या निवडणूकीत भाजपचा पराभव ही बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरणार असून, येणा-या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक मध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकां -यांच्या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्र प्रमुख खा.संजय राऊत बोलत होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना खा. राऊत यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादीचा आपण पराभव करू शकतो, परंतु सत्ता, संघटन असलेल्या भाजपचा पराभव करताना खूप काळजी घ्यावी लागेल. सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजप सेनेला संपविण्याच्या विचारात आहे, परंतु ते कधीच शक्य होणार नाही. भाजपला शिवसेनेची ताकद खूपत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवरच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल. पुढील विधानसभा, महापालिका निवडणुकीची तयारी आतापासूनच करण्याची आवश्यकता आहे, असे राऊत म्हणाले.