मुंबई नगरी टीम
मुंबई । उत्तरप्रदेश,गोव्यासह तीन राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवण्याच्या घोषणा राष्ट्रवादीने केल्यावर,राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.शरद पवार यांचे देशपातळीवरील काम आणि उंची पाहून नव्या पिढीने बोलताना तारतम्य पाळले पाहिजे,असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
उत्तरप्रदेश,मणिपूर आणि गोवा या तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूका लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून भाजप आणि भाजपच्या नेत्यावर शरसंधान साधले होते.त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर निशाणा साधत,राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका त्यांनी केली होती.फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.शरद पवार यांचे देशपातळीवरील काम आणि उंची पाहून नव्या पिढीने बोलताना तारतम्य पाळले पाहिजे,असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे असे सांगतानाच, राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल असेही पवार म्हणाले.
माझ्या राजकीय जीवनाला ३० वर्षे झाली आहे.मी बारामतीमधून खासदार म्हणून निवडून गेलो.मात्र सहा महिन्यात परत आलो.त्यामुळे शरद पवार यांना लोकसभेत जावं लागले.त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून गेलेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक,ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा खासदार भगिनी सुप्रिया सुळे हे देतील. शरद पवार यांची देशाच्या राजकारणात असलेली उंची,त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना याचा विचार करून नव्या पिढीने बोलताना तारतम्य पाळले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.