“मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो” वादग्रस्त व्हिडीओवर नाना पटोलेंनी केला खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई । भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यांनी मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.पटोले यांच्या या वक्तव्यांनंतर भाजपच्या नेत्यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.दरम्यान या व्हिडीओबाबत पटोले यांनी खुलासा केला आहे.माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो असे पटोले यांनी स्पष्ट केले.

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्या आहे.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये ?
मी का भांडतो ? मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात.शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात.मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली.एक ठेकेदारी नाही केली.जो आला त्याला मदत करतो.म्हणून मी मोदीला मारु शकतो,त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला.एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या येथे आहे.”असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले !
पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंचप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो. तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यांची साधी दखलही घेत नाही,आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देवू शकतो.काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय ? कधीकाळी स्वातंत्र्यांच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला आहे. केवळ सत्तेसाठी का ? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे,की दहशत पसरविणारी संघटन? नानाभाऊ केवळ शाररीक उंची असून चालत नाही,वैचारीक बौद्धीक उंची पण असावी लागते असा टोलाही फडणवीस यांनी पटोले यांना लगावला.

प्रविण दरेकर काय म्हणाले !
नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये अनेकदा केली आहेत.पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना असे वक्तव्य केले असेल तर ते दुर्दैवी आहे.पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपणाचा बालिशपणा मांडून ठेवला आहे की, प्रत्येक आठवड्याला खालच्या पातळीची टीका करतात.मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत.तरी मारण्याची भाषा होत असेल तर हे लाजिरवाणे आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंना फटकारले आहे.

 

नाना पटोले यांचा खुलासा
माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

Previous articleशरद पवारांनी फडणवीसांना ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता ‘काशीचा घाट’ दाखवतील
Next articleठाकरे सरकारच्या काळात महाराजांच्या गडकिल्ल्यांचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न