उत्सव व जाहिरातबाजी हीच सरकारची कामगिरी
धनंजय मुंडे यांची घणाघाती टिका
मुंबई दि.३० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारची तीन वर्षे जनतेसाठी निराशेची, पश्चाताप करायला लावणारी असून, उत्सव व जाहिरातबाजी हीच सरकारची गेल्या तीन वर्षातील कामगिरी असल्याची घणाघाती टिका विधानपरिषदेतीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारला उद्या तीन वर्ष पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कामगिरीचा खरपूस समाचार घेतला आहे.
सरकारची असंवेदनशील वृत्ती, चुकलेली धोरणे, फसलेले निर्णय व अक्षम्य अकार्यक्षमतेमुळे राज्याचा विकास खुंटला आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, युवक, महिला, विद्यार्थी असे समाजातले सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. सरकारविरोधात जनतेतून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कदाचित यामुळेच तिसऱ्या वर्षपूर्तीचे ‘सेलिब्रेशन’ न करता ‘कम्युनिकेशन’ करण्याचा सावध निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असावा असा टोला मुंडे यांनी लगावला आहे. ‘मोदी-फेस्ट’चे सेलिब्रेशन फसल्यानंतरचा हा निर्णय त्यांच्यासाठी अपरिहार्यच होता असेही मुंडे म्हणाले.
‘सेलिब्रेशन’ म्हणजे उत्सव व ‘कम्युनिकेशन’ म्हणजे जाहिरातबाजी हीच भाजपच्या तीन वर्षांच्या कामगिरीची द्विसूत्री राहिली आहे. ‘अच्छे दिन’ जाहिरातीचा जुमला करुन सरकार सत्तेवर आले . तेव्हापासून विकासकामांवर कमी व जाहिरातींवर अधिक खर्च असे चित्र आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या सरकारच्या शपथविधीवर जनतेच्या करातून ९८.३३ लाख रुपये खर्च करण्यात आले. तिथून सुरु झालेली उधळपट्टी गेली तीन वर्षे वाढतंच आहे. तीन वर्षात राज्यावरील कर्जाचा बोजा २ लाख ९३ हजार कोटींवरुन ४ लाख ४४ हजार कोटी म्हणजे दिड लाख कोटींनी वाढला. ही वाढ ५० टक्के आहे. त्यातुलनेत विकास किती झाला, हा प्रश्न आहे. गेल्या तीन वर्षात नोंद घ्यावी असे एकही काम काम सरकारने केले नसल्याचे मुंडे यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.
सरकारच्या बेजबाबदार, भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे आहेत. यंदा अर्थसंकल्प सादर होऊन सहा महिने उलटले तरी त्यातल्या घोषणांचे शासन निर्णय जारी झालेले नाहीत. आज वर शेतकरी कर्जमाफीसह जे काही महत्वाचे शासन निर्णय सरकारने काढले त्यातला एकही शासन निर्णय परिपूर्ण आणि निर्दोष नव्हता. त्या शासन निर्णयांमध्ये वारंवार सुधारणा कराव्या लागल्याचे अनुभवल आहे, त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर झाला. सरकार शासन निर्णय नीट काढू शकत नाही, त्यावरुन राज्य कस चालवत असतील हे लक्षात येते. तीन वर्षे सरकार सातत्याने चुका करीत आहे, परंतु चुकांमधून शिकत नाही हे दुर्दैव आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘वायफाय’ मोफत, पण शौचालय वापरासाठी पैसे मोजा असे सरकारचे धोरण आहे. त्यातही स्वच्छ भारत टॅक्स कुठे जातो हा सुद्धा प्रश्न आहे अशी टिकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राज्यातील सर्वात गंभीर प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन वर्षात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शंभरहून अधिक शेतकरी किटनाशकांच्या फवारणीमुळे मृत्युमुखी पडले. गेल्या सहा महिन्यात ८०० हून अधिक शेतकऱ्यांना किटकनाशकांची विषबाधा झाली, तरीही सरकारला त्याची दखल घ्यावी वाटली नाही. आता मात्र मुख्यमंत्री शेतकरी किटकनाशकांची फवारणी चुकीच्या पद्धतीने करतात असे सांगून त्यांनाच दोष देत आहेत, हे अधिक दुर्दैवी असल्याचे मुंडे म्हणाले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासातला शेतकऱ्यांचा पहिला संप, महाराष्ट्रात भाजप सरकारच्या काळात झाला याची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल. कर्जमुक्ती कि कर्जमाफी या घोळात तीन वर्षे गेली. अखेर नाईलाजाने जाहीर केलेल्या कर्जमाफी इतके घोळ घातलेत की ते संपण्याची चिन्हे नाहीत. शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी गेली. बँक खात्यांचा घोळ, आधार कार्डाचा घोळ, प्रमाणपत्राचा घोळ झाल्याने यातून सरकारची कामगिरी दिसून येते अशा शब्दात मुंडे यांनी सरकारच्या तीन वर्षातील कामगिरीचे वाभाडे काढले.