संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे ३६ दिवसांचे वेतन कापणार
मुंबई, दि. ३० राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे झालेली नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी शासनाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे ३६ दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐन दिवाळीत १७ ते २० ऑक्टोबर या काळात आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. उच्च न्यायालयाने हा संप बोकायदेशीर ठरवल्यामुळे त्याबाबतचे निकष अंमलात आणताना शासनाने प्रत्येक दिवसासाठी आठ दिवस याप्रमाणे नुकसानभरपाई वसूल करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. या ३६ दिवसांपैकी चार दिवसांचे वेतन या महिन्यात कापण्यात येणार आहे. उरलेल्या ३२ दिवसांचे वेतन पुढच्या सहा महिन्यात कापण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना तसेच एसटी वर्कर्स काँग्रेस, महाराष्ट्र एसटी ड्रायव्हर, कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या सभासदांनी हा संप पुकारला होता.