पंधरा दिवसात शिवस्मारकाच्या कामाच्या निविदेला मंजुरी ?
मुंबई दि.१ अरबी समुद्रातील शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार आहे. शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. पुढील पंधरा दिवसात स्मारकाच्या कामांच्या निविदांची अंतिम मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी सांगितले.
केंद्राच्या मंजूरीमुळे शिवस्मारकाची उंची १९२ मीटरऐवजी २१० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.स्मारकाच्या कामाला गती मिळत असून पुढील पंधरा दिवसात स्मारकाच्या कामांच्या निविदांची अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या विषयी पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे .अशी माहिती मेटे यांनी दिली.
बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील स्मारकाच्या कामासाठी आलेल्या निविदांपैकी एका कंपनीला सुरुवातीच्या कामाची मंजुरी मिळणार असल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले . तसेच अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार आहे. शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने सोमवारी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहितीही मेटे यांनी दिली . किनाऱ्या लगत समुद्रात सुमारे साडे तीन किलोमीटर अंतरावरील १५.८६ हेक्टर जागेवर हे स्मारक उभे केले जाणार आहे. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत येणाऱ्या जागतिक पर्यटकांना तसेच महाराजांचा वारसा नव्या पिढीला कळावा यासाठी महाराजांची माहिती देणारे दालन, वस्तूसंग्रहालय, शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर या स्मारकात असणार आहे.