कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा
खा. राजु शेट्टी यांचा आरोप
मुंबई दि.२ कर्जमाफी योजनेत कोट्यावधी रूपयांचा आयटी घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजु शेट्टी केला आहे.
या कोट्यवधी रुपयांच्या आयटी घोटाळ्यात आयटी विभागाचे सचिव विजयकुमार गौतम आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे सहभागी असल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारची महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड हि कंपनी कर्जमाफीचे काम करत असल्याचे दाखवले जात असले तरी गौतम आणि धवसे यांनी मागच्या दाराने नागपूर स्थित एका खाजगी कंपनीला हे काम दिले असल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केला आहे. वीस कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हे काम विना निविदा देण्यात आल्याचेही खा. शेट्टी यांनी सांगितले. गौतम आणि धवसे यांनी स्वतःच्या हितासाठी अनुभव नसलेल्या कंपनीला हे काम दिल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याद्यातील घोळ, आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास होत असलेला विलंब याला आयटी घोटाळा जबाबदार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.