मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.तर दुसरीकडे शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचे आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल असा इशारा बंडखोर आमदारांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना पुन्हा साद घालत,आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा,यातून निश्चित मार्ग निघेल,आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू,कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका,असे आवाहन त्यांनी बंडखोर आमदारांना केले.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. बंडखोर आमदार आणि शिवसेनेत दररोज आरोपांच्या फैरी झडत आहेत.त्यात आज बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संवाद साधत या सगळ्या गोंधळाचा आज शेवटचा दिवस असल्याचा इशारा शिवसेनेला दिला आहे.पक्षप्रमुखांचे आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगले घडले पाहिजे अशी आमची इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत.शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचे आहे.त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल असा इशारा आमदार केसरकर यांनी दिला आहे.उद्या अविश्वास ठरावावर मतदान करावे लागले तर ते मतदान उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नसेल असे सांगून,उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे आम्ही कधीच म्हटले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बंडखोर आमदार यांना पुन्हा आवाहन केले आहे.
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात.आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे,आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत.आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही,माझे आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे,आपण या माझ्या समोर बसा,शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल,आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू .कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका,शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही,समोर आलात बोललात तर मार्ग निघेल.शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे .समोर येऊन बोला आपण मार्ग काढू असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.