लवकरच मंत्रिपदाची शपथ घेईन !
नारायण राणे यांचा दावा
मुंबई दि.७ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पुढच्या काही दिवसामध्ये मंत्रिपदाची शपथ घेईन असा दावा आज नारायण राणे यांनी केला आहे.
राणे म्हणाले की, शिवसेना हा एक नंबरचा घाबरट पक्ष असून, मी मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही. यावेळी नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना राणे यांनी काँग्रेसमध्ये आता आक्रमकता उरली नसल्याचा टोला लगावला.काँग्रेसने कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपाचाच विजय होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
राणे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशामुळे राज्यातील भाजप सरकारच धोक्यात आले आहे. शिवसेनेने जरी सरकारचा पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्यास सरकार वाचू शकते याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर, आम्ही या पुढे भाजपला पाठिंबा देणार नसल्याची घोषणा पवार यांनी केल्याने सरकारवर संकटाचे ढग जमा झाल्याची चर्चा आहे.