मुंबई नगरी टीम
मुंबई । अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड झाला असून सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका भाजपा कदापि खपवून घेणार नाही. काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ चा नारा पक्षातर्फे ठिकठिकाणी होणा-या आंदोलनातून देण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोला येथे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मुंबईत या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ठाण्यात, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन जळगावात आंदोलन करणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुण्यात, चंद्रपुरात वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती संभाजीनगर येथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, नंदुरबार येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. अहिल्यादेवी नगर येथे आ. राम शिंदे, नाशिकमध्ये आ. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे तर नागपूरमध्ये प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील हे आंदोलनात सहभागी होणार आहेत.