मुंबई नगरी टीम
मुंबई । महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने मते दिली आहेत.महाविकास आघाडीकडून मतयंत्रावर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले,त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मते दिली आहेत.जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० व्होल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला,त्या ठिकाणी मतयंत्रे चांगली होती का ? असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला.महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत मविआचे खासदार निवडून आले,तेव्हा मतयंत्रे चांगली होती. सध्या महाविकासवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. महाविकासच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे असेही बावनकुळे म्हणाले.भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो.पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार.उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपासोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता, असाही टोला बावनकुळे यांनी लगावला.