वाढत्या सांप्रदायिक विचारांच्या विरोधात संघर्ष करण्याची तयारी ठेवा
खा. शरद पवार
सातारा दि.१३ सध्या देशाच्या दृष्टीने काळ मोठा आव्हानात्मक आला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली गाय घेऊन जाणाऱ्यांच्या हत्या वाढल्या आहेत. सांप्रदायिक विचार कृतीत आणण्याची खबरदारी काही घटकांकडून घेतली जात आहे. या सांप्रदायिक विचारांच्या विरोधात संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे विचार राट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांनी येथे मांडले.
पन्नास वर्षाच्या संसदीय कार्याच्या गौरवार्थ सातारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देताना शरद पवार बोलत होते. मारूतराव गोपाळराव निकम (वय ८७) व इंदुमती मारूतराव निकम (वय ७८) या शेतकरी दांपत्याच्या हस्ते हा भव्य सत्कार सोहळा जिल्हा परिषद मैदानावर दिमाखात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आहे. शेतमालाला किंमत नाही. शेती अर्थव्यवस्था संकटात आली आहे. उद्योजक, कारखानदार अडचणीत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. एका बाजुला महागाईचे संकट आहे, तर दुसऱ्या बाजुला मंदीचे सावट आहे. शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होईल असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र त्याची चिंता लोकशाहीच्या माध्यमातून ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आली आहेत, त्यांना पडलेली दिसत नाही याबद्दल पवार यांनी तीव्र शब्दात खेद व्यक्त केला. सांप्रदायिक विचार सातारा जिल्ह्याने कधी जवळपास उभा केला नाही. चव्हाण साहेबांच्या विचारांमध्ये अशा प्रकारच्या अघोरी विचाराला कधीही थारा दिला नाही. त्यांच्या विचाराचा धागा घेऊन पुढे जात असताना करायच्या संघर्षाचे नेतृत्व सातारा जिल्ह्याने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विकासाचा अर्थ म्हणजे मुठभरांचा विकास नव्हे, तर शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक म्हणजे विकास. गरीबातल्या गरीब माणसाचे अश्रू पुसण्याचे काम आपल्याला करायचे आहे. महाराष्ट्राच्या जाज्ज्वल्य अभिमानाचा इतिहास जतन करू शकलो तर संपूर्ण देशाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला. पवार यांनी आपल्या भाषणात आपल्या ५० वर्षाच्या राजकीय प्रवासाचा मागोवा घेताना यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे स्मरण करताना त्यांनी दादांच्या स्वातंत्र्य लढ्यातील अपूर्व योगदानाचा उल्लेख केला.
प्रसिध्दी माध्यमांमधून राजकीय घडोमोडींविषयी अनेक अटकळी बांधल्या जातात. मात्र शरद पवार यांचे मत घेतल्याशिवाय कोणतेही राजकीय गणित सुटत नाही. त्यामुळे त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही समीकरण मांडले जाणार नाही असे उद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. आपण अनेक नेते पाहिले, पवार यांच्यासारखा लोकांसाठी इतके परीश्रम घेणारा नेता पाहिला नाही. त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. पण ते विचलित झाले नाहीत. ते विजयाने हुरळून गेले नाहीत आणि पराभवाने खचुनही गेले नाहीत. प्रचंड मोठा मित्रपरिवार, प्रचंड नेटवर्किंग,स्किल, गुणांची पारख करून प्रोत्साहन देण्याची त्यांची हातोटी हे गुण तरूण पिढीने त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. त्यांनी अनेक निर्णय धाडसाने घेतले, असे चव्हाण म्हणाले.
यावेळी रामराजे नाईक – निंबाळकर, सुनील तटकरे, महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे यांची पवारांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, आनंदराव पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, उपराकार लक्ष्मण माने, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आभार मानले.
शरद पवार ही चालतीबोलती शाळा !
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचा शरद पवार हा एकमेव माणूस आहे, ज्याने महाराष्ट्राचे नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले. शरद पवार ही सामाजिक व राजकीय जीवनाची चालतीबोलती शाळा आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याप्रसंगी काढले. शरद पवार हा माणूस साधा नाही. त्यांनी महाराष्ट्राला हसवले, गंभीर व्हायला लावले, चिंतातुर केले. इतकी वर्षे राजकारणात टिकून राहणे सोपे नाही. मनमोहनसिंग यांचा त्यांच्यावर खूप मोठा विश्वास होता. अनेक कठीण प्रसंगी मार्ग काढून देण्याचे काम त्यांनी केले. आम्ही कुठेही गेलो तरी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहू. त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही इतके पुढे जावू शकलो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.