राज्य सरकारच्या विरोधात काॅग्रेस अधिक आक्रमक होणार !
पुढील रणनीती ठरविण्यासाठी उद्या बैठक
मुंबई दि.१३ राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात काॅग्रेसने सुरू केलेल्या “जनआक्रोश” आंदोलनाला राज्यात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादा नंतर आता काॅग्रेस अधिक आक्रमक झाली असून, सरकार विरोधात पुढील आंदोलनाची आखणी करण्यासाठी उद्या मंगळवारी काॅग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे.या बैठकीत सरकार विरोधात अधिक आक्रमक आंदोलन करण्याची रणनीती आखण्यात येणार आहे.
उद्या मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काॅग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.कर्जमाफी आदी मुद्यावर काॅग्रेसने सरकारच्या विरोधात सुरू केलेल्या जनआक्रोश आंदोलनाला राज्यातील विविध भागात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने काॅग्रेस पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे.राज्यातील विविध मुद्यावर पुढील आंदोलनाची दिशा उद्या होणा-या बैठकीत ठरविण्यात येणार आहे.आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यात पुन्हा काॅग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समजते.