अपयश लपवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांकडून “नौटंकी”
भाजपने आरोप फेटाळले
मुंबई दि.१५ कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेले आरोप भाजपने फेटाळले असून, केवळ अपयश लपवण्यासाठी आ. हर्षवर्धन जाधव यांच्याकडून हि नौटंकी केली जात असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.
आ.जाधव यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे. असले उद्योग करण्याची भाजपला कसलीच गरज नाही. आमचा कोणत्याही पक्षाच्या आमदारावर डोळा नसून भाजपकडे चांगल्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच आ. जाधव हे नाटक करत असल्याचा टोला माधव भंडारी यांनी लगावला आहे.
माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी ५ कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट आ. हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्याला भंडारी यांनी उत्तर दिले आहे.