कारंबा पंपगृहाचे काम 3 महिन्यात पूर्ण होणार
मुंबई, दि. १६ कारंबा पंपगृहाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून या कामाचे १५ दिवसात शॉर्ट टेंडर काढून कामास सुरुवात करावी. येत्या ३ महिन्यात हे काम पूर्ण होवून सोलापूर शहराला पाणी उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मागणीच्या अनुषंगाने पुण्यात आज यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी राज्यमंत्री शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य अभियंता विलास रजपूत, अधिक्षक अभियंता श्री. खपोले, चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्नाटक व अंबालिकाच्या धर्तीवर सिना नदीवरिल रिदोरे, कवे व शिरापूर आणि भिमा नदीवरील पुलुज, आलेगाव तसेच माण नदीवरील मल्लेवाडी येथे यांत्रिकी पद्धतीचे दरवाजे प्रायोगिक तत्वावर यांत्रिकी विभागाकडून डिझाईन करुन घ्यावे, हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच जास्तीत जास्त पाणी साठविण्यात यावे. या कामासाठी विस्तार सुधारणा अंतर्गत सीएसआर, कारखाना, लोकवर्गणी व बिगरसिंचन पाणीपट्टीतून निधीचे नियोजन करावे, अशा सूचनाही राज्यमंत्री शिवतारे यांनी यावेळी दिल्या.
सोलापूर-विजापूर रोडवरील भिमा व सिना नदीवरील टाकळी, वडकबाळ येथील रोड कम बंधारा बांधण्याचे प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या. सिना व भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून जून – जुलैमध्ये दरवाजे काढण्यात येतात. त्याऐवजी सोलापूर जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती व धरणातील शाश्वत पाणीसाठी ५० टक्के असल्याची खात्री करुन नियोजन करावे. सुस्ते – तारापूर येथील बुडीत बंधाऱ्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.