भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी आ. सुरेश हाळवणकर यांची नियुक्ती
मुंबई दि.१७ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी पक्षाचे आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.
आ. सुरेश हाळवणकर विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना भाजपाच्या संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे इचलकरंजी शहराध्यक्ष, भाजपा इचलकरंजी शहराध्यक्ष, भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष या पदांवर काम केले आहे. १९९५ साली ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. २००४ साली इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष झाले. ते २००९ व २०१४ असे सलग दोन वेळा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनांचे नेतृत्व केले होते. कष्टकरी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आंदोलनेही केली होती. ते इचलकरंजीच्या लोटस टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक तसेच स्वामी विवेकानंद यार्न डाईंग प्रोसेसर्सचेही संस्थापक चेअरमन आहेत. १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे सदस्य म्हणून काम केले होते.