मुख्यमंत्र्यांकडून “दिलगिरी” पण नाभिक समाज आंदोलनावर ठाम !
सुधीर राऊत हे भाजपचे कार्यकर्ते, त्यांचा महामंडळाशी काडीचाही संबंध नाही – दळे
मुंबई दि.१८ पाटस येथिल कार्यक्रमातील भाषणावेळी दिलेल्या उदाहरणातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, तरीही या विधानामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो अशी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.मात्र सुधीर उर्फ बंडू राऊत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा नाभिक महामंडळाचा कसलाही संबंध नसल्याने मुख्यमंत्र्यांनी माध्यमातून जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी करून जाहीर माफी न मागितल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज नाभिक समाजाच्यावतीने दुकाने बंद ठेवून जिल्ह्या जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष सुधीर उर्फ बंडू राऊत यांना पत्र लिहून नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त केली आहे.मात्र सुधीर उर्फ बंडू राऊत हे भाजपचे कार्यकर्ते असून, नाभिक महामंडळाचा आणि त्यांचा कसलाही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रमाणे जाहीर वक्तव्य केले त्याच प्रमाणे त्यांनी प्रसार माध्यमातून नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केली असून, जोपर्यंत मुख्यमंत्री जाहीर माफी मागत नाहीत तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.