राष्ट्रवादीकडून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत
मुंबई दि. १८ कोपर्डी बलात्कारप्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये घडलेले बलात्कार प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. या प्रकरणामध्ये सर्वस्तरातून निषेध नोंदवले गेले होते. त्यानंतर सरकारने लवकरात लवकर कोपर्डीचा निकाल लावणार असल्याचे जाहीर केले होते.आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी झाली. आज निकाल लागण्याची शक्यता होती परंतु जिल्हा सत्र न्यायालयाने तीन आरोपींना याप्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आरोपींना २१ नोव्हेंबरला न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत या तिन्ही दोषींना फाशीचीच शिक्षा होईल आणि पीडीतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.