माता बालमृत्यु रोखणाऱ्या सामाजिक संस्थांबरोबर शासनही पुढाकार घेणार
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि.१८ माता बालमृत्यु रोखण्यासाठी काम करणाऱ्या स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसुतीशास्त्र तज्ञ अशा आरोग्य विषयी काम करणाऱ्या संघटनेबरोबर बाल माता मृत्यु रोखणाऱ्या उपक्रमात शासनही पुढाकार घेण्यास तयार असल्याची माहिती महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
सेंट रेजीस, परळ येथे स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसुतीशास्त्र तज्ञ यांच्या संघटनेच्यावतीने आयोजित फेम-२०१७ च्या परिषदेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी अभिनेत्री पुनम ढिलाँन, शिल्पा शेट्टी, FOGSI च्या अध्यक्षा डॉ. रिश्मा पै, डॉ.वनिता राऊत, डॉ. हेमा दिवाकर, डॉ. नवीन राव, डॉ.ऋषीकेश पै, डॉ. रोहन हतवा, डॉ.जयदिप टंक यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व बालविकास मंत्री मुंडे म्हणाल्या की, आरोग्य, ग्रामविकास आणि महिला व बालविकास विभागाची आरोग्य सेवा केंद्रे आहेत. ती केंद्रे अद्ययावत करण्यासाठी तसेच महिला व बालकांच्या आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शासन गरोदर व स्तनदा माता तसेच बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता विविध योजना राबवित असून बालकांना सकस आहार देण्यात येतो. राज्यात महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी झाले असून कुपोषणाचेही प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले.
स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या तीन वर्षापासून मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच माता बाल मृत्यु, कुपोषण, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीसह प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्रीरोग तज्ञ, प्रसुतीशास्त्र तज्ञ संघटना (FOGSI) मुंबई स्त्रीरोग तज्ञ, प्रसुतीशास्त्र तज्ञ सोसायटी (MOGS) आशिया आणि ओसियन स्त्रीरोग तज्ञ, प्रसुतीशास्त्र संघटना (AOFOG) आणि महाराष्ट्र चाफ्टर ऑफ सोसायटीज असिस्टेड रिप्रॉडक्शन आदि संस्था माता बाल मृत्यु आणि आरोग्य सेवा विषयी चांगले काम करीत असल्याचे सांगितले. या संस्थांच्या उपक्रमात प्रसिध्द सिनेतारका, विख्यात डॉक्टर काम करीत असल्याने हा उपक्रम यशस्वी होत आहे. यावेळी माता बाल आरोग्याविषयी मान्यता या आरोग्य विषयी लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच आरोग्य विषयक माहिती असलेल्या पुस्तिकांचे अनावरण मंत्री पंकजा मुंडे यांचेसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.