मार्वे-गोराई किनाऱ्यावर केरळच्या धर्तीवर बॅक-वॉटर टूरिझम सुरू करणार

मार्वे-गोराई किनाऱ्यावर केरळच्या धर्तीवर बॅक-वॉटर टूरिझम सुरू करणार

मुंबई, दि. १९  मालाड-मार्वे येथे सुरु होणाऱ्या रो-रो जेट्टीमुळे येथील कोळी बांधवांना आणि स्थानिक रहिवाश्यांना याचा फायदा होईल. तसेच मार्वे-गोराई किनाऱ्याच्या संथ पाण्यामध्ये केरळच्या धर्तीवर बॅक-वॉटर टूरिझम सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे,जेणेकरून मुंबईकरांना खुद्द मुंबईत पर्यटनाची उत्तम संधी मिळू शकेल, असा विश्वास शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केला.

मालाड-मार्वे येथील रो-रो जेट्टीच्या बांधकामाचे भूमिपूजन तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.तावडे म्हणाले, मनोरी-गोराई-मार्वे या किनाऱ्यावर भरपूर गाळ आहे. यामध्ये ड्रेझिंग केल्यास हे किनारे गाळमुक्त होतील, याचा फायदा येथील रहिवाश्यांना होईल. मार्वे येथे गेले अनेक वर्षापासून जेट्टी उपलब्ध नव्हती. मार्वेवासियांना मनोरी गावात जाण्यासाठी पाण्यातून आणि वाळूतून वाट काढत व त्रास सहन करत बोट पकडावी लागत असे. परंतू शासनाने अग्रक्रमाने रो-रो-जेट्टीचा प्रकल्प प्रत्यक्षात आणला आणि आज त्याचे भूमिपूजन झाले. यामुळे मनोरी आणि मार्वेवासियांना लवकरच जेट्टीची सुविधा मिळणार आहे.

मार्वे-मनोरी-गोराई या किनाऱ्याजवळची कांदळवने अशीच पडून आहेत, या कांदळवनाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास होऊ शकतो. या परिसराची पाहणी केली असता या कांदळवनाच्या परिसरात सुमारे २३३ प्रकारचे पक्षी आहेत. शिवाय विविध प्रकारचे प्राणीही असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनासाठी उत्तम ठिकाण ठरु शकते, त्यामुळे हा परिसर पर्यटन केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस आहे, असेही तावडे यांनी सांगितले.केरळच्या धर्तीवर या परिसरात पर्यटन केंद्र सुरू झाल्यास येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यायाने पर्यटनाचा ओघही वाढेल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

 

Previous articleआगामी अधिवेशनात केसरकरांची प्रकरणे बाहेर काढणार !
Next articleज्ञानेश्वर साळवे इफेक्ट, मंत्रालयातील खिडक्यांवर ग्रील लावणार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here