ज्ञानेश्वर साळवे इफेक्ट, मंत्रालयातील खिडक्यांवर ग्रील लावणार !
मुंबई दि.२० तुळजापूर येथील तरूण शेतकरी ज्ञानेश्वर साळवे याने शेतीमालाचे भाव पडल्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली होती. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत.
मंत्रालयात येणा-या अभ्यागतांच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृह विभागाने हा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. काही दिवसापूर्वी ज्ञानेश्र्वर साळवे या तरुण शेतक-यांने शेतीमालाचा भाव पडल्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून ‘शोले स्टाईल’आंदोलन करीत मंंत्री व अधिका-यांना घाम फोडला होता. त्या पाश्वभूमीवर खिडक्याच्यावर ग्रील बसविण्याची सूचना करण्यात आली आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने वरिष्ठ अधिका-यांनी आढावा घेत मंत्रालयातील खिडक्याच्या वरील जागेत लोखंडी ग्रील व चौकटी असलेल्या ठिकाणी तातडीने दरवाजे बसविण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली असल्याचे समजते.