यापुढे दारूची दुकाने, बारला देवी देवतांची नाव देण्यास बंदी ?
मुंबई दि. २० यापुढे राज्यातील देशी दारुची दुकाने, बिअर बारला महापुरुष, देवी- देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव देता येणार नाही, याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे समजते.
अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारुची दुकाने बिअर बारला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकाऱ्यांशी बैठक घेवून चर्चा केली. यानंतर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. बैठकीत देशी दारुची दुकाने, बिअर बार आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच देवी- देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत कामगार विभाग कायद्यात सुधारणा करण्यात येवून मुंबई प्रोव्हिजन अॅक्टमध्ये बदल केले जाणार आहेत.