मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल, खांदेपालट ! 

मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल, खांदेपालट ! 

” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर ५ डिसेंबर २०१४ रोजी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा दुस-यांदा विस्तार ८ जुलै २०१४ रोजी केला आणि आता पुन्हा विस्तार, फेरबदल, खांदेपालट अशी चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सहा पक्षांच्या महायुतीचे सरकार आज कार्यरत आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती वानखेडे स्टेडियमवर एका शानदार सोहोळ्यात. त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. त्यावेळी ५ डिसेंबर २०१४ रोजी पहिला विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी हा विधानभवनाच्या प्रांगणात झाला तर या सरकारचा दुसरा विस्तार ८ जुलै २०१६ रोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाला. म्हणजे या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनाच्या बाहेरच झाला हे विशेष.” 

शिवसेना – भाजपा युतीच्या १९९५ साली आलेल्या सरकारचा पहिला शपथविधी अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ मार्च १९९५ रोजी शिवतीर्थावर झाला होता. डॉ. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर श्री. गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या वेळच्या भाजपा सरकारचा शपथविधी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडीयमवर झाला.

मंत्रीमंडळ विस्तार या मुद्यावर अनेक किस्से घडलेले आहेत जे अतिशय रोचक असे आहेत. मंत्रीमंडळ विस्तार हा राजकीय पत्रकारांचा अत्यंत आवडता विषय. मग एकदा का अशी खबर आली की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की मग कल्पनेचे पतंग उडवायला सुरुवात. मग ज्या पत्रकाराचे ज्या आमदाराशी वा नेत्याशी चांगले संबंध आहेत अशा आमदार वा नेत्यांची हा नेता मंत्री होणार ! या नेत्यांची वर्णी लागणार ! यांना अमुक अमुक खाती मिळणार ! अशा बातम्या सुरु. ब-याच वेळा काही नावे ही सारखीच असतात.

मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल, खांदेपालट या बाबतचे प्रश्नही मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत विचारुन त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरु असली आणि पत्रकारांनी विस्ताराचा प्रश्न पुढे काढला की मग, `चला, हा आता पत्रकार परिषद संपवण्यासाठीचा शेवटचा प्रश्न ! असे मुख्यमंत्री म्हणायचे. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद विस्ताराचा प्रश्न आल्याशिवाय संपतच नसे, असे प्रसंग वारंवार घडलेले आहेत.

टाईपिंग मिस्टेक 

राज्याचा, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार आणि त्याचे किस्से यावर छानसे पुस्तक होऊ शकते पण आपण काही किस्से पाहु या.

वसंतदादा पाटील हे अत्यंत कर्तबगार मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांच्या मंत्रिमंडळात वा. रा. शेरेकर हे मंत्री होते. पण एकदा वा. रा. शेरेकर यांचेच नांव मंत्रिमंडळाच्या यादीत टाईप करायचे राहुन गेले. त्यामुळे बिच्चाऱया शेरेकर यांना मंत्रिमंडळातून काही काळ बाहेर रहावे लागले होते.

डॉ. राम मनोहर त्रिपाठी यांचाही एक किस्सा प्रा. मधु  दंडवते यांनी आम्हाला ऐकवला होता. शरद पवार अत्यंत चाणाक्ष नेते. त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ही गोष्ट प्रा. मधु दंडवते यांनी ऐकवली. डॉ. राम मनोहर त्रिपाठी हे मंत्री होणार होते. पण त्यांचे नाव यादीत नव्हते. डॉ. त्रिपाठी यांनी प्रा. दंडवते यांच्याशी चर्चा करतांना प्रा. दंडवते यांनी त्यांना विचारले की, `क्या, शरद पवारजीने सफारी पहना था ?’. डॉ. त्रिपाठी म्हणाले, `हां!’ प्रा. दंडवते म्हणाले, फिर बराबर है, सफारी को चार जेब रहती है। हर एक जेब में मंत्रिमंडल की अलग अलग सुची रहती थी उनके सफारी में आपको जो सुचि बताई वह सिर्फ आपको खुश करने के लिये. त्यावर  हास्याची लकेर उमटली. अर्थात डॉ. राम मनोहर त्रिपाठी यांच्यासारखा सज्जन नेता नंतर राज्याचा मंत्री बनला हा भाग वेगळा.

शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी ही त्रिमुर्ती तर जाम धम्माल करीत होती. या नेत्यांनी तर काँग्रेसच्या अनेक आमदारांना फोनवर आवाज बदलून `मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, तुमचा उद्या सकाळी अकरा वाजता राज भवनावर मंत्री म्हणून शपथविधी आहे! असे सांगून राजभवनावर पाठवल्याचे किस्से या तिघांनी चवीने सांगून राजकीय निरीक्षक व पत्रकारांत हास्याची कारंजी उडवली आहेत.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ख-या अर्थाने `मासलिडर’ असणारे नेते रामदास आठवले हे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री बनले तेव्हा त्यांना मित्रांनी शपथविधीचे कपडे आणून देण्यासाठी मदत केली. हा तळागाळातील लोकांसाठी लढणारा नेता कार्यकर्ते व मित्रांच्या मदतीने राजभवनावर शपथविधीसाठी पोहोचला आणि त्याची त्यांनी जाणही ठेवली आहे.

शिवसेना – भाजपा युतीचे सरकार १९९९ मध्ये जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाही आघाडीचे सरकार अधिकाररुढ झाले. २००४ मध्ये १ नोव्हेंबरला पुन्हा सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख आर.आर.पाटील यांच्या सरकारच्या शपथविधी आझाद मैदानावर झाला. रावसाहेब रामराव उर्फ आर.आर.आबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्य घटनेची प्रत हाती घेऊन शपथ घेतांना त्यांचे हात अक्षरशः थरथरत होते. अर्थात आर.आर.आबांनी आपला ठसा उमटवला तो सर्वांच्या हृदयसिंहासनावर विराजमान होऊन. अनेकवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार म्हणून आमदारांनी सफारी शिवलेत पण त्या बिच्चा-या आमदारांचे सफारी शपथविधी न होताच (वापरुन वापरुन) फुकट गेले.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवले यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असे त्र्यंबक मारुती कांबळे उर्फ टी. एम. कांबळे हे सुध्दा असेच मंत्रीपदापासून वंचित राहिले होते. त्यांनी अखेर आपला वेगळा पक्ष काढला. रा.सू. गवई आणि रामदास आठवले यांच्या समवेत काम करणारा नेता अखेर सत्तेची कोणतीही पदे न घेताच या जगातून निरोप घेता झाला. अविनाश महातेकर…… सुध्दा मंत्री होणार अशा बातम्या आल्या पाहुया महातेकर…… कधी मंत्री पदावर विराजमान होताहेत ते. आठवले यांच्या सहकाऱयांपैकी दयानंद म्हस्के आणि प्रीतमकुमार शेगांवकर मंत्रीपदी विराजमान होऊन गेले. सरकारला पाठींबा देणाऱया प्रा. जोगेंद्र कवाडे यांना मंत्रीपदाचे भाग्य मिळू शकले नाही. रिपब्लीकन नेत्यांपैकी रामकृष्ण सूर्यभान उर्फ (रा.सू) दादासाहेब गवई यांना मात्र `राजयोग’ चांगलाच लाभला होता.

सरकारला पाठींबा देणा-या आमदारांना मंत्रीपद मिळण्यामध्ये हर्षवर्धन पाटील, डॉ. विजय कुमार गावीत, शिवाजीराव नाईक, अशोक पाटील डोणगांवकर, अनिल देशमुख, सुनिल केदार ही मंडळी १९९५ नंतर प्रकाशात आली. डॉ. विजयकुमार गावीत आणि शिवाजीराव नाईक अजूनही मंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत.

आणि गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री बनले! 

गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे भारतीय जनता पार्टीमधले एक लोकप्रिय नेते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड मधून सर्वाधिक मतांनी गोपीनाथराव निवडून आले. मुंडे आणि गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात जाणार ही अटकळ सर्वांनी बांधली होती. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र दामोदरदास मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार होते. त्यांच्याबरोबर नितिन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे हेही शपथ घेतील असे वाटले होते. २०-२३ मे २०१४ च्या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांना नवी दिल्लीत बोलावून घेतले. मुंडे यांनी फडणवीस आणि खडसे या दोघांना सांगितले की माझे नाव मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत नाही. फडणवीस आणि खडसे यांनी सल्ला मसलत, विचारविमर्श केल्यानंतर मोदींकडे जाणार कोण? हा प्रश्न उभा राहिला. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र मोदी यांची भेट सहजरित्या मिळाली. देवेंद्रांनी नरेंद्रांना मुंडे यांचे नाव मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत नसल्याचा मुद्दा चर्चेत काढला. नर्रेंद्र मोदींना सरळ कसे विचारणार की, `मुंडे साहब का नाम सूचि में क्यों नहीं ?’ पण देवेंद्र फडणवीस हे तरुण, अभ्यासू वकिली बाणा असलेले(कसलेले) नेते होते म्हणून त्यांनी नरेंद्रांसमोर युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. मोदी फडणवीसांना म्हणाले, `देखो दो दिन बाद मैं भाजपा के पार्लमेंटरी बोर्ड की बैठक बुला रहा हुँ, ओर उस बैठक में गोपीनाथ मुंडेजी का नाम महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद का उम्मीदवार करके घोषित कर रहा हुँ. ६ महिने बाद महाराष्ट्र का विधानसभा चुनाव है और भाजपाके मुख्यमंत्री पद के उम्मीदवार गोपीनाथ मुंडे रहेंगे, अगर मैने उन्हे यहा केंद्र में मंत्री बनाया तो उनका महाराष्ट्र की तरफसे ध्यान कम हो जायेगा और मुझे महाराष्ट्र में भाजपा की सत्ता लानी है. इसलिए में कोई ‘रिस्क’ लेना नहीं चाहता.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपला युक्तीवाद केला. देवेंद्र नरेंद्रांना म्हणाले, “मोदीजी आापका कहना बिलकुल सही है. लेकिन अगर आप मुंडेजी को अभी केंद्र में मंत्री परिषद में स्थान दोगे और उनको आप जो विभाग सौपेंगे उसके जरीए महाराष्ट्र की ओर अगले ६ मास तक `फंड’ भेजा जाये तो उसका हमें चुनाव जीतने की दृष्टी से लाभ हो सकता है। देवेंद्रांचा हा युक्तीवाद बिनतोड  होता जो नरेंद्र मोदींना पटला आणि मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत गोपीनाथ मुंडे यांना स्थान प्राप्त झाले. २६ मे २०१४ रोजी मुंडे केंद्रात मंत्री झाले. त्यांच्याकडे ग्रामविकास खाते आले.  पण दुर्दैवाने ३ जून २०१४ रोजी अपघाती मृत्यु हे कारण बनले व गोपीनाथराव सारख्या लोकनेत्याला काळाने आपल्यातून हिरावून नेले.

( मुंडे यांचा केंद्रात प्रवेश कसा झाला हे खडसे यांनीच पत्रकारांना सांगितले)

देवेंद्र फडणवीस यांचा हा युक्तीवाद नरेंद्र मोदी यांच्या विश्वासास पात्र ठरला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर मोदींनी देवेंद्रांच्या हाती महाराष्ट्राचा राज्यसकट… सुपूर्द केला. देवेंद्र हे नरेंद्रांच्या गळ्यातले ताईत बनले.

 

योगेश वसंत त्रिवेदी 

9892935321

Previous articleकोपर्डीचा निकाल महिलांना बळ देणारा
Next articleराज्यातील पाच हजार विश्वस्त संस्थांची नोंदणी रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here