मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ला भाडोत्री गुंडाकरवी

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ला भाडोत्री गुंडाकरवी

काॅग्रेसचा आरोप

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ला हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर मनसेच्या भाडोत्री गुंडानी केला आहे. कार्यकर्ते शिल्लक राहिले नसल्याने मनसेने भाडोत्री गुंडाकरवी सुपारी देऊन हा हल्ला घडविल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सावंत म्हणाले की,मनसेच्या गुंडानी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा आम्ही निषेध करतो. तलवारी आणि चॉपर घेऊन हेल्मेटच्या खाली तोंड लपवून हल्ल्याची पध्दत पाहता हे संपूर्णपणे सराईत सुपारीबाज गुन्हेगार असल्याचे दिसून येते. भ्याड हल्ला करून केवळ २४ सेकंदात पळ काढणारे कार्यकर्ते असूच शकत नाहीत.  २००८ साली उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे कोर्ट कचेऱीच्या फेऱ्यात अडकलेल्या मराठी तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि त्यांच्याशी आपला संबध नाही म्हणून कोर्टात स्वतःची कातडी वाचविणाऱ्या राज ठाकरेंचे स्वार्थी व सेटलमेंटचे राजकारण मराठी तरुणांनी आता ओळखले आहे. मराठी तरूणांना रोजगार देऊन त्यांचा उत्कर्ष करण्याऐवजी त्यांना गुन्हेगार बनवणा-या मनसेला आता मराठी तरुणांचा पाठिंबा राहिलेला नाही.  मनसेकडे आता कोणताही मुद्दा राहिला नसून अशा पध्दतीच्या हिंसक कारवायाच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसे करीत आहे असे सावंत म्हणाले.

‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही अशी धमकी देणा-या मनसेवर सरकार निर्मात्यांची बाजू घेऊन कारवाई करेल अशी अपेक्षा होती, परंतु मुख्यमंत्र्यानी वर्षा बंगल्यावर राज ठाकरे यांच्यासमवेत मांडवली केली होती.  त्यावेळीच राज्य सरकार हे मनसेला पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले होते असे सावंत म्हणाले.

सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच राजकीय पक्षाच्या कार्यालयावर तलवार आणि चॉपरने हल्ला करण्याइतकी मनसेची हिंमत झाली. काँग्रेस कार्यालयापासून अवघ्या २५ मीटर अंतरावर पोलीस स्टेशन असून देखील हा हल्ला झाला यातून भाजपच्या राज्यामध्ये राजकीय पक्षांची कार्यालये देखील सुरक्षित नाहीत असा गंभीर निष्कर्ष निघतो. मनसेच्या या कारवायांमागे भाजपाचा हात असून मुख्यमंत्र्याकडून मनसेच्या गुंडगिरीला संरक्षण दिले जात आहे, असा आरोप करताना सदर घटना होऊन २४ तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून साधा निषेधाचा सूर ही न येणे अतिशय दुर्देवाचे आहे असे सावंत म्हणाले.

Previous article“हल्लाबोल” पदयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
Next articleशैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १३०० शाळांचे स्थलांतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here