शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १३०० शाळांचे स्थलांतर
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये आणि गुणवत्ता टिकावी यासाठी २० पट संख्येपेक्षा कमी संख्या असलेल्या सुमारे १ हजार ३०० शाळांचे स्थलांतर करण्यात येणार असून, या निर्णयामुळे कोणत्याही शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार नाही तर; या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे १०३ कोटीचा खर्च कमी होईल अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयानुसार कमीत कमी २० विद्यार्थी ज्या शाळेत असतील अशा ठिकाणी एक किलो मिटर पर्यंत चालत जाण्याच्या अंतरावर शाळेची सोय निर्माण करून, २० पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नियमानुसार राज्यातील सुमारे १२ हजार शाळा बंद होवू शकतात.परंतु डोंगराळ आणि आदिवासी भागातील अडचणी लक्षात घेवून राज्यातील एकूण ५ हजार २ शाळा शून्य ते १० पट संख्या असलेल्या शाळा आहेत.त्यापैकी ४ हजार ३५३ जिल्हा परिषदेच्या तर ६९ शाळा या खाजगी अनुदानित आहेत.४ हजार ४२२ शाळांचा विचार केला तर त्यापैकी ९०९ शाळा या स्थलांतरीत करण्याच्या स्थितीत नसल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामध्ये सिंधुदूर्ग १०३, गडचिरोली १९७, रायगड १०७, रत्नागिरी १२५, सातारा १०७, शाळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये आणि गुणवंता कमी होवू नये म्हणून अशा शाळा शिक्षकांसह स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात येवून त्याची अंमलबजवणी करण्यात येत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.