विद्युत निरक्षण विभागात सुरू आहे कोट्यावधीचा भ्रष्टाचार !
लिफ्ट कंत्राटदाराकडे दीड ते दोन लाखांची मागणी
मुंबई : शासनाच्या उद्योग उर्जा कामगार विभागाअंतर्गत येणा-या विद्युत निरीक्षण विभागात लिफ्टच्या विविध कामांमध्ये संगनमताने भ्रष्टाचार सुरू असून, यामध्ये मुख्य विद्युत निरिक्षकासह काही लिफ्ट निरीक्षकही सहभागी असल्याची तक्रार लिफ्ट उत्पादक आणि देखभाल करणा-या संघटनांनी केली आहे.यासंदर्भात लिफ्ट उत्पादक, देखभाल करणा-या संघटनांनी आणि कंत्राटदारांनी लाचलुचपत विभागामार्फत किंवा उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अत्यंत संवेदनशील आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला हा विभाग असल्याची चर्चा सध्या कंत्राटदारांमध्ये असून, मुंबई, पुणे, ठाणे या तीन जिल्ह्यांसाठी असलेला लिफ्ट निरीक्षक मालामाल झाला आहे.अगदी सुरूवातीपासून एक लिफ्ट निरीक्षक मुंबई आणि परिसरात सेवेत असून, दरवर्षी १२ हजार नवीन लिफ्ट बनविल्या जातात.एक लिफ्ट बवनिण्यासाठी ६ ते ८ हजार रूपये अधिक रकमेची मागणी केली जाते.लिफ्ट जर तातडीने बसवून घ्यायची असेल तर २० ते २५ हजार रूपये मोजावे लागतात. परंतु अशी नियमामध्ये कसलीही तरतुद नसताना हि रक्कम घेतली जाते.
नवीन लिफ्ट परवान्यासाठी प्रत्येकी दीड ते दोन लाख रूपयांची मागणी संबंधित परवानाधारकाकडून केली जाते.परवान्याचे नुतणीकरण करायचे असल्यास एक ते दीड लाख रूपयांची मागणी संबंधितांकडे केली जाते. दर वर्षाला हा लिफ्ट निरीक्षक अंदाजे १० कोटीची कमाई करत असल्याची तक्रार या संघटनेने केली आहे. सध्या १० निरीक्षक पदे असून, प्रत्येक पदावरील निरीक्षकाची चौकशी करण्याची गरज असल्याची तक्रार लिफ्ट निर्माते आणि देखभाल करणा-या संघटनांनी केली आहे. हा संपूर्ण विभाग भ्रष्टाचाराने बरबटला असून, मुख्य विद्युत निरीक्षकाच्या वरदस्तानेच हे सुरू आहे त्याकडे हा अधिकारी डोळेझाक करीत असल्याने कोणावरही कारवाई होत नसल्याची तक्रार या संघटनेने केली आहे.