राज्य महामार्ग व राज्य मार्गावरील ९० टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची काम पूर्ण
मुंबई: राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खड्डेमुक्त रस्ते अभियानाच्या मंत्रालयातील वॉररुमला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी खड्डे बुजविण्याच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या दालनात खड्डेमुक्त रस्ते अभियानासाठी वॉररुमची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे राज्यातील खड्डे बुजविण्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. या वॉररुमला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली.
यावेळी पाटील यांनी सांगितले की, राज्यातील प्रमुख राज्य महामार्ग, राज्य मार्ग तसेच जिल्हा मार्गांवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रमुख राज्य महामार्ग व राज्य मार्गावरील ९० टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण होत आली आहेत. प्रत्येक खड्ड्यांची माहिती घेऊन ती गुगलद्वारे वेबसाईटवर टाकण्यात येते. त्यानंतर ते खड्डे बुजविल्यानंतरही त्याची छायाचित्रासह माहिती या साईटवर देण्यात येते. त्यामुळे रिअर टाईम कामांची माहिती एकत्रित वॉररुममध्ये जमा होत आहे.
प्रत्येक रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती मिळताच ती संबंधित अभियंत्याला सांगून ते बुजविण्यात येतात. तसेच या सर्व कामांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
खड्डेमुक्त रस्त्यांच्या कामावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करून ऊर्वरित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच निर्देश दिले.