नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा
दिल्ली : भाजपचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपवर सातत्याने टीका करणारे आणि नाराज असलेल्या नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्यानंतर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.शेतक-यांच्या प्रश्नावर त्यांनी आपल्याच सरकार विरोधात उघड उघड भूमिका घेतली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा दोनच दिवसापूर्वी अकोल्यात शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. त्याला नाना पटोले यांनी समर्थन देत सहभाग घेतला होता. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.