वैद्यनाथ दुर्घटना: मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी सहा लाख तर; जखमींना दीड लाख रूपयांची मदत
पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतली रूग्णालयात जाऊन जखमींची भेट
लातूर : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दुर्घटनेतील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये व अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख असे एकूण सहा लाख रुपये आणि जखमींना दीड लाख रुपये मदत देण्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केली. दरम्यान, मयताच्या कुटूंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत अकरा कर्मचारी जखमी झाले होते, त्यातील सुभाष कराड, मधुकर आदनाक, गौतम घुमरे या तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य जखमींवर लातूर येथील डाॅ. विठ्ठल लहाने यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी आज लातूर येथे जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुर्दैव घटनेत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यू बद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मयत व जखमी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांच्या मी पुर्णपणे पाठिशी आहे. कारखान्यातील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि माझे वैयक्तिक एक लाख असे एकूण सहा लाख रुपये, कंत्राटदारांचे मयत मजूरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख व वैयक्तिक एक लाख असे एकूण तीन लाख रुपये तसेच जखमी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक एक लाख व मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास हजार रुपये असे दीड लाख रुपये मदत देण्यात येईल, रूग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करू याशिवाय मयताच्या कुटूंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना वैद्यनाथ साखर कारखान्याची वीट ना वीट रचताना आम्ही पाहिलं आहे, हा कारखाना फक्त कारखाना नसून आमचं घर आहे. जे झालं त्याच दुःख आहे पण साहेबांच्या जाण्याचं डोंगरा एवढ दुःख ज्यांनी झेललं त्या पंकजाताई आमच्या मदतीला वेळीच धावल्या आहेत, त्यांच्या रूपाने घरचा कर्ता माणूस आमच्या पाठिशी असल्याची जाणीव झाली अशा शब्दांत वैद्यनाथ च्या दुर्घटनेतील जखमी कर्मचाऱ्याची आई भारती बाई बालाजी मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर सध्या लातूर येथील लहाने हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी रूग्णालयात जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी तीनही मुंडे भगिनींना पाहताच जखमींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. त्यातील काही महिलांनी तर पंकजाताई व प्रितमताई यांच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. रूग्णालयात उपचार घेत असलेला कर्मचारी माधव मुंडे यांच्या आई भारती बाई तर फार धीराने बोलल्या. एवढी मोठी घटना आमच्या घरात घडली असती तर आम्ही जे केले असतं ते सर्व ताई तुम्ही व कारखान्याने आमच्यासाठी केलय. जे झालं त्याच दुःख आहे. साहेबांच्या जाण्याचे डोंगरा एवढ दुःख होतं, त्या दुःखात तुम्ही बहिणी उभ्या राहिलात, तेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून खंबीरपणे उभा राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जखमींच्या नातेवाईकांना दिला धीर
वैद्यनाथ साखर कारखान्याचे कर्मचारी हे माझे कुटूंबिय आहेत, कुटूंबप्रमुख या नात्याने मला त्यांची संपूर्ण काळजी आहे, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील, चांगल्यात चांगले उपचार देऊन त्यांना मी बरी करेल, या ना. पंकजाताई मुंडे यांच्या शब्दाने जखमींच्या नातेवाईकांना मोठा धीर मिळाला.