१ व २ जुलै २०१६ च्या घोषित शाळांना २० टक्के अनुदान
विनोद तावडे यांची घोषणा
नागपूर : १ व २ जुलै, २०१६ अन्वये मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सुमारे १५८ प्राथमिक शाळा व ५०४ तुकड्यांवरील १ हजार ४१७ शिक्षक व ६३१ माध्यमिक शाळा व १ हजार ६०५ तुकड्यांवरील ५ हजार ३७३ शिक्षक व २ हजार १८० शिक्षकेत्तर अशा एकूण ८ हजार ९७० कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक शाळा, आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी आज विधान परिषदेत घोषित केले. २० टक्के अनुदान प्रकरणी मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषांगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.दोन्ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे १०० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.