वैद्यनाथ कारखान्याच्या दुर्घटनेतील दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न

वैद्यनाथ कारखान्याच्या दुर्घटनेतील दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न

धनंजय मुंडेचा आरोप

सातजणांच्या मृत्यूस संचालक मंडळ जबाबदार

नागपूर : परळी-वैजनाथ येथील वैदयनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत सात कामगारांचा कारखान्याच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झालेला असतानाही याप्रकरणी दोषी कारखाना प्रशासनाला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याप्रकरणी बैठक घेवून अधिक चौकशी व कारवाई करण्याचे निर्देश तालिका सभापती विद्या चव्हाण यांनी दिले.

यासंबंधी आज नियम ९३ अन्वये उपस्थित प्रश्नावर बोलताना कामगारमंत्री संभाजी पाटील यांनी केवळ भोगवटदार नामदेव आघाव यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे व या घटनेची आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे उत्तर दिले. या उत्तराला धनंजय मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेत कारखान्याच्या चुकीमुळे सात कामगारांचा जीव जातो. सात कामगार जखमी होतात तरीही कुणालाही दोषी धरले जात नाही या कारखान्याची मागील दोन वर्षात फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून तपासणी झाली नाही व सुरक्षेबाबत निर्देश देण्यात आलेले नव्हते. जाणीपूर्वक बंद दिवशी कारखाना पाहणीचे नाटक केले जाते. कारखान्यास अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नाही. ऊसाच्या रसाच्या टाकीची देखभाल योग्य झाली नाही. त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
कारखाना प्रशासनाच्या सुरक्षाविषयक दुर्लक्षामुळे सात लोकांचा जीव गेल्याने संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली.कामगार विभाग अशाच प्रकारच्या इतर घटनांमध्ये वेगळा न्याय आणि वैदयनाथच्या बाबतीत वेगळा न्याय लावून सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार हेमंत टकले,सतिश चव्हाण, अमरसिंह पंडीत,आमदार जयंत पाटील,भाई जगताप,किरण पावसकर आदींनीही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

Previous articleआ. आशिष देशमुखांची विरोधकांशी गट्टी जमली !
Next articleआज निवडणुक झाल्या तर राज्यात सत्तापरिवर्तन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here